धुलीवंदनाच्या दिवशी ‘या’ गावात जावायाची काढतात गाढवावरून जंगी मिरवणूक
धुलीवंदनाची आहे अनोखी परंपरा, जावाई होतात भूमिगत, यंदाचा मान या जावायाला
बीड दि ७(प्रतिनिधी)- जावाई जेंव्हा सासरवाडीला जातो तेंव्हा त्याचा वेगळाच थाट असतो. त्याचबरोबर जावयाची घोड्यावरील मिरवणूक तर सर्वांनी पाहिली असेल मात्र बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. त्यावेळी आख्खा गाव डीजेच्या तालावर डान्स करतो. यंदा अविनाश करपे हे जावई यंदाच्या अनोख्या परंपरेचे मानकरी ठरले आहेत.
केज तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. गेल्या ९० वर्षापासून ही परंपरा सुरूच आहे. आजघडीला गावात जावयांची संख्या शंभराच्या पुढे आहे, तरी धुलिवंदनाची चाहूल लागताच अनेक जावाई भूमिगत होतात.असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत एका जावयाला पकडून परंपरा कायम राखण्यात येथील युवक आतापर्यंत यशस्वी राहिले आहेत. जावाई शोध मोहिमेत गावातील महिला देखील सहभागी होतात. यावर्षी गाढवावर स्वार होण्याचा मान जवळबनचे जावई अविनाश करपे यांना मिळाला आहे. युवराज पटाईत यांचे ते लाडके जावई आहेत. पाच वर्षे यांना सापडलं नव्हतो,यावर्षी देखील सापडत नसतो पण साप निघाल्याची ओरड झाली म्हणून बाहेर आलो आणि सापडलो असे करपे म्हणाले आहेत. पण असे असले तरी गाढवावरुन मिरवणूक काढणाऱ्या जावायाला अंगठी देऊन संपूर्ण पोशाख केला जातो. आणि जावायाचा राग शांत केला जातो. आतापर्यंत जावयाला मिरवण्यामुळे कुठलाही भांडण तंटा झाला नाही हे विशेष म्हणावे लागेल.
विडा हे गाव जहागीरदाराचे गाव म्हणून आळखले जाते.पंच्चाहत्तर वर्षांपूर्वी तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयांची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून धिंड काढण्यात आली होती. तेव्हापासून जावई धिंड ही गावाची परंपराच होऊन गेली आहे.