अमरावती – कुत्र्याने कोंबडी खाल्ल्याच्या कारणावरून झालेला वाद तिघांच्या मृत्यूचे कारण ठरला. नाचोना (ता. दर्यापूर) येथे चारचाकीने चिरडून मंगळवारी रात्री तिघांना ठार केल्यानंतर पसार बापलेकांना खल्लार पोलिसांनी बुधवारी सकाळी कोकर्डा शिवारातून अटक केली.
पोलिस सूत्रांनुसार, चंदन राधेश्याम गुजर (३२) व राधेश्याम गोविंद गुजर (६०) अशी आरोपींची नावे आहेत. चंदनने चारचाकी वाहनाने घरापुढे राहणाऱ्या अंभोरे कुटुंबातील अनुसया श्यामराव अंभोरे (वय ६५), श्यामराव लालूजी अंभोरे (७०) व चंदनची काकू अनारकली मोहन गुजर (४३) यांना चिरडून ठार केले. अपघातात शारदा उमेश अंभोरे (३६), उमेश अंभोरे (४२) आणि किशोर श्यामराव अंभोरे (३८, सर्व रा. नाचोना) हे गंभीर जखमी झाले आहेत.
तुझ्या कुत्र्याने माझी कोंबडी का खाल्ली, या कारणावरून शिवीगाळ झाली. त्यावर किशोरने तो कुत्रा माझा नाही, तर मोकाट असल्याचे सांगितले. किशोर अंभोरे यांना काही वेळाने घराबाहेर मोठ्याने चारचाकी वाहन रेज केल्याचा आवाज आला. पाठोपाठ किंकाळ्याही ऐकू आल्या.