पुणे प्रतिनिधी – पुणे शहराच्या परिसरामध्ये जमिनीच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. प्लॉटिंग करुन त्याची विक्री केली जात आहे. नागरिकांकडून प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. मात्र, काही जणांकडून नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत. एका महिलेने वाघोली येथील श्रेयस डेव्हलपर्स यांच्याकडून प्लॉट खरेदी केला. मात्र, प्लॉट न देता त्याची परस्पर विक्री करुन महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. यावरुन श्रेयस डेव्हलपर्स चे किशोर कुंजीर (रा. खांदवे नगर, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2019 ते आज पर्य़ंत हवेली तालुक्यातील कोलवडी येथील गट नं. 17 येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर कुंजीर यांनी कोलवडी येथील गट क्रमांक 17 मधील प्लॉटची श्रेयस डेव्हलपर्स नावाने विक्री केली. फिर्यादी महिलेने 25 फेब्रुवारी 2019 मध्ये आरोपी याच्याकडून साडे चार लाखांना 30 नंबरचा प्लॉट विकत घेतला. यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख रुपये घेतले. मात्र, किशोर कुंजीर याने व्यवहार पुर्ण न करता फिर्यादी यांनी घेतलेला प्लॉट दुसऱ्याला विकला. किशोर कुंजीर याने प्लॉट न देता दोन लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने लोणीकंद पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन किशोर कुंजीर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर करीत आहेत.