Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात ॲपद्वारे ड्रग्ज विक्री!; १९ जण अटकेत, ५८ लाखांचा माल जप्त

मोबाइल नंबरशिवाय चालणाऱ्या ॲपच्या माध्यमातून शहरात ड्रग्जचे जाळे पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲपच्या माध्यमातून पेडलर आणि ग्राहक थेट संपर्कात राहात होते. तब्बल २३ दिवस गुप्त पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले. या प्रकरणाचे धागेदोरे आता राजस्थानपर्यंत पोहोचले असून, तेथे मेफेड्रोन तयार करणाऱ्या कारखान्यावर लवकरच कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईपूर्वी शहरातील सर्व पेडलर आणि ग्राहकांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. ड्रग्ज येते कुठून? आणि नेटवर्क कसे कार्य करते? याची सविस्तर माहिती गोळा केल्यानंतरच छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यादरम्यान पोलिसांनी २८९.१९ ग्रॅम मेफेड्रोन, ४२२ ग्रॅम गांजा आणि २६० ग्रॅम पावडर (ज्यात मेफेड्रोनचे अंश आढळले) असा एकूण सुमारे ५८ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्यासह विमानतळ, चंदननगर, खराडी, वाघोली, लोणीकंद आणि लोहगाव पोलिस ठाण्यांच्या पथकाने केली.

पोलिस तपासात, आरोपी सुरुवातीला व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संपर्कात होते. मात्र, नंतर त्यांनी पद्धत बदलली. ते टेलिग्रामसह इतर ॲपच्या कॉलिंग सुविधेद्वारे संपर्क साधत होते. सिग्नल आणि जँगीसारख्या ॲपचा वापर केला जात होता. या ॲपमध्ये मोबाइल क्रमांकाची गरज नसून फक्त युजर आयडीद्वारे लॉगिन करून संवाद साधला जातो. त्यामुळे पोलिसांसाठी ट्रॅकिंग करणे कठीण झाले होते, अशी माहिती झोन ७चे उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी बहुतांश जण उच्चशिक्षित असून, चांगल्या कुटुंबातील आहेत. ते पदवीधर असून, नशेच्या आहारी गेल्यामुळे स्वतःही ड्रग्जचे सेवन करत होते आणि इतरांना विकून पैसे कमावत होते. तपासात हेदेखील समोर आले की, हे नेटवर्क राजस्थानशी जोडलेले आहे. आरोपींच्या चौकशीतून मेफेड्रोनसारखे अंमली पदार्थ राजस्थानमधून मागवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

तेथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्स तयार करणारा कारखाना कार्यरत असून, पोलिसांनी त्याला रडारवर घेतले आहे. हा कारखाना लवकरच उद्ध्वस्त करण्याची योजना आखली जात आहे. तसेच अटक केलेल्या १९ आरोपींच्या संपर्कात असलेल्या इतरांचीही चौकशी सुरू आहे. या कारवाईदरम्यान ड्रग्जच्या पुरवठ्यासाठी वापरली जाणारी एक कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी आपले गैरकृत्य लपवण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या.

मात्र, सातत्याने पाळत ठेवल्यामुळे संपूर्ण नेटवर्क उघड झाले, असे पोलिसांनी सांगितले. ही मोहीम १ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवण्यात आली. वाघोली, लोणीकंद, लोहगाव, विमानतळ परिसर, चंदननगर आणि खराडी या भागांत छापेमारी करण्यात आली. ड्रग्सची विक्री आणि सेवन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!