भुकंपामुळे देशात हाहाकार, हजारो लोकांचा मृत्यू
इमारती कोसळल्या, रुग्णालये भरली, विदारक विध्वंस, मोदींकडून शोक व्यक्त
अंकारा दि ६(प्रतिनिधी)- आजचा सोमवार तुर्कस्तान आणि सीरियासाठी घातवार ठरला आहे. कारण पहाटेच आलेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर १,६२१ हून अधिक लोक ठार आणि सुमारे ५,००० इतर जखमी झाल्याचे वृत्त आहे. एकामागून एक असे भूकंपाचे धक्के बसल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशांतील शेकडो इमारती कोसळल्या. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. काहींची घरे जमीनदोस्त झाली आहेत, तर अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताने भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान तुर्कस्तानातील एएफएपी आपत्कालीन प्राधिकरण आणि यूएस भूगर्भीय सेवा यांनी आग्नेय तुर्कस्थानातध ७.५ तीव्रतेचा भूकंप नोंदवला आहे. अकिनोझू शहराच्या चार किमी आग्नेयेला दुपारी १.२४ वाजता हा भूकंप झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. भुकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियाचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. व्हिडीओजमध्ये अनेक इमारती कोसळल्या असून जमीन उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची शक्यता आहे.
वाहतूक मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे नेटवर्कच्या पुलांची आणि ट्रॅकची तपासणी होईपर्यंत रेल्वे वाहतूक स्थगित केली आहे. तसेच मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. तसेच दर दहा मिनिटांनी एक मृतदेह बाहेर काढला जात आहे. अनेक लोक अडकल्याची भीती आहे. स्थानिक रुग्णालये देखील रुग्णांनी पूर्णपणे भरली आहेत.