
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाने खरातच्या घरावर टाकलेल्या धाडीत कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारांचे पुरावे हाती लागले आहेत. फसवणूक आणि खंडणीतून कमावलेला पैसा जमिनींमध्ये गुंतवून खरातने एक मोठे आर्थिक जाळे विणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खरातच्या घरात मालमत्तेच्या ‘कच्च्या नोंदी’ असलेली कागदपत्रे सापडली आहेत. शासकीय नोंदणी न करता केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मालमत्तांचे व्यवहार करून खरातने अनेक जमिनी स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. कराची चोरी करण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी मालमत्तांची अधिकृत नोंदणी न करता केवळ कच्च्या पावत्यांवर हा व्यवहार सुरू होता.

धाडीदरम्यान तपास यंत्रणांनी 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मनी लाँड्रिंगसाठी काही ‘शेल कंपन्या’वापरल्या गेल्याचा संशय असून, त्या माध्यमातून व्यवहारांचे वळण फिरवण्यात आले आहे. अशोक खरात विरोधात आता तपास यंत्रणांनी आपला फास अधिक घट्ट केला आहे. शेल कंपन्या, बनावट व्यवहार आणि नोंद न केलेल्या उत्पन्नाचे धागेदोरे, बँक खाते, CDR आणि आयकर रिटर्नची छाननी सुरु आहे. त्यामुळे खरात विरोधात तपासाचा फास आवळत चालला असून मनी लाँड्रिंगचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


