उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे एकनाथ शिंदे गट फुटणार?
शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, एकनाथ शिंदे अपात्र ठरण्याच्या चर्चेने धास्ती वाढली?
मुंबई दि १० (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरु होणार आहे. पण त्याआधी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार सत्तेत आल्याने शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे शिंदे गट फुटण्याच्या मार्गावर आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अजित पवार गटाला मंत्रीपद दिले जाणार आहे. पण अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतर आमदार धास्तावले आहेत. एक तर अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाल्याने अनेकांची मंत्री होण्याची इच्छा मावळली आहे. दुसरीकडे अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे जाण्याची इच्छा अनेक आमदारांनी व्यक्त केली आहे. मध्यंतरी याच कारणामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना आपला विदर्भ दाैरा सोडून परत यावे लागले होते. सध्या अनेक आमदार सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांना मंत्रिपद न मिळाल्यास पक्ष बदलण्याच्या विचार करत आहेत. मंत्रीपद नाही निदान आमदारकी तरी वाचवावी असा विचार आमदार करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आपल्या समर्थकांची समजूत काढणे अवघड जात आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या भाजपसोबत आल्याने तिकीट वाटपात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाला आपला पत्ता कट होईल अशी भीती वाटत असल्याने शिंदे गट लवकरच दुभंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अजित पवार यांनी अर्थमंत्रालय, ऊर्जा खात्यासह अनेक महत्त्वाची खाती मागितली होती, पण त्यावर शिंदे गटाचा आक्षेप आहे. पण सरकारकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे फक्त उर्जामंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. तर वित्त खाते रिक्त ठेवण्यात आले होते. त्यामुळे शिंदे गटाची मागणी धुडकावत अजित पवारांना वित्तमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा आपला विचार करत नसल्याची भावना आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.