एकनाथ शिंदेच्या नगरविकास मंत्रालयाचा भूखंड घोटाळा?
भाजपाच्या 'त्या' तक्रारीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, पहा प्रकरण
मुंबई दि २८ (प्रतिनिधी)- भूखंड प्रकरणावरुन एकनाथ शिंदे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिंदे हे नगरविकास मंत्री असताना वांद्रेतील अनाथालयाच्या ट्रस्टची मालमत्ता अनारक्षित केली गेली व ती विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्तांची परवानगी नसताना के.बी.के. रिअल्टरला वाणिज्य विकासकामांसाठी विकली, असा आरोप किरण फाटक यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
किरण फाटक यांनी आमदार आशीष शेलार यांच्या मूळ जनहित याचिकेत हस्तक्षेप करणारी याचिका दाखल केली आहे.तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात वांद्रे येथील अंदाजे १००० कोटी रुपयांच्या ३७ एकर भूखंडाचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत भाजप आमदार आशीष शेलार यांनी गेल्या वर्षी जनहित याचिका दाखल केली होती. महत्वाचे म्हणजे विकास झाल्यानंतर याची किंमत ५००० कोटी होणार होती. आता भ्रष्टाचाराशी संबधित मुद्दा तसेच जनहित लक्षात घेत या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला करणार असल्याचे फाटक यांनी सांगितले आहे. खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी अनाथांसाठी राखीव भूखंड अनारक्षित करण्यासाठी सगळय़ा सरकारी यंत्रणांनी ठरवून केलेला हा गंभीर प्रकार असल्याचे फाटक म्हणाले आहेत. यावेळी आशिष शेलार केवळ राजकीय हेतून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही फाटक यांनी केला आहे. एकदंरीत भाजपामुळेच एकनाथ शिंदे पुन्हा वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वांद्रे येथील बाई अवाबाई फ्रामजी पेटीट ट्रस्टची ३५६६८०.२५ चौ.मी. जागा ही सार्वजनिक कामासाठी १९९१ पासून राखीव आहे. २०१६ साली महाराष्ट्र सरकारने विकास आराखडा २०३४ अंतर्गत ती राखीव ठेवली. पुढे मुंबई महानगरपालिकेने राखीव जागेकरीता हरकती मागवल्या. बाई अवाबाई फ्रामजी पेटीट गर्ल्स हायस्कूलच्या विश्वस्तांनी त्यांची लेखी हरकत नोंदवली. त्यानंतर नगरविकास मंत्रालयाने विकास आराखडा २०३४ मध्ये बदल करून ती मालमत्ता अनारक्षित केली होती.