
कात्रज पंचक्रोशीतील प्रश्नांबाबत नागरिकांचा एल्गार
'कात्रज विकास आघाडी'चा प्रशासनाविरोधात आंदोलनाचा निर्धार, तारीखही ठरली
पुणे दि ६(प्रतिनिधी)- कात्रज पंचक्रोशीतील प्रश्नांबाबत प्रशासनाविरोधात ८ जून रोजी सां.५ वाजता जनता दरबाराच्या माध्यमातून कात्रज चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. ‘कात्रज विकास आघाडी’ च्या वतीने नमेश बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिक एकवटले आहेत.
आपल्या मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी कित्येक आंदोलने, मोर्चे , उपोषणे करून देखील राज्यकर्ते आणि प्रशासनाचा कानाडोळा सतत कात्रजच्या विकासाकडे होतोय अशी भावना स्थानिकांमध्ये आहे.
कात्रज, अपर इंदिरानगर, आंबेगाव, मांगडेवाडी भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, नव्याने समाविष्ट गावांमध्ये २४ तास अखंड वीजपुरवठा, कात्रजसाठी विद्युत उच्चदाब स्वतंत्र केंद्र उभारण्यात यावे , यासाठी गायारान मधील ५ एकर जागा कात्रज विकास आघाडीने सुचवली होती तरी ही त्यावर कोणतीही दखल घेतली गेली नाही, दररोज वेळेत मुबलक पाणीपुरवठा व्हावा आणि कात्रज साठी स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्यासाठी देखील गायरान मधील जागा ताब्यात घेऊन नियोजन करण्यात यावे . तसेच कात्रज चौकातील वाहतूक कोंडी व कात्रज कोंढवा रोड वरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी एकत्रित डीपीआर, कात्रज चौकातील प्रस्तावित मेट्रो व सुरू असलेला उडाणपूल, ग्रेड सेपरेटर यांचा एकत्रित डीपीआर करावा, शिवसृष्टी ते खड़ी मशिन चौक व कात्रज डेअरी ते मांगडेवाडी उड्डाणपूल उभारावा, महापालिकेकडून आकारण्यात आलेला झिजिया कर रद्द करावा , अप्पर येथील गवणी वसाहत निर्मूलन प्रश्न ,
महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांतील अन्यायकारक आरक्षणे रद्द करावी, आदी मागण्यांसाठी कात्रज विकास आघाडी कडून जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, तसेच आमदार चेतन तुपे, भीमराव तापकीर आणि संजय जगताप माजी आमदार योगेश टिळेकर आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कात्रज विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष नमेश बाबर यांनी दिली.