Latest Marathi News
Ganesh J GIF

उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात गंभीर खुलासे

आरोपपत्र दाखल, पवार, ठाकरे, मोदींच्या नावाचा वापर करत पतीची कारकीर्द संपवण्याची धमकी

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सट्टेबाज अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा यांना अटक केली होती. आता त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असुन अनेक गंभीर खुलासे करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दाखल केलेल्या ७९३ पानांच्या आरोप पत्रात अनिक्षा जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांना मोठी ऑफर दिली होती. असा दावा करण्यात आला आहे. अनिक्षा जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांच्याशी चॅटद्वारे संभाषण केले आहे. हे चॅट आरोपपत्रात जोडण्यात आलं आहे. यात अनिक्षा म्हणाली आहे की, माझ्या वडिलांना माहिती आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधात पोलीस वापरून ते व्हिडिओ खोटे असल्याचा दावा करतील. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. या चॅटमध्ये अनिक्षाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मोदींच्या नावाने धमकी दिली असल्याचं आढळून आलं आहे. या चॅटमध्ये मोठा वाद होईल, यात फडणवीस यांना आपलं पद देखील गमवावं लागेल, अशी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात मदत करण्याच्या बदल्यात अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी ती धुडकावून लावल्यानंतर त्यांना व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याबरोबरच दहा कोटींची खंडणी मागण्यात आली होती. अनिक्षाने फॅशन डिझायनर असल्याचे सांगून अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधत गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी मदतीची मागणी केली. दरम्यान अनिल जयसिंघानीविरुद्ध १७ गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे तो ८ वर्षे पोलिसांपासून फरार होता. यामुळे गेल्या काही वर्षांत १००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा अनिल जयसिंघानीने अमृता यांच्याशी संभाषणात दरम्यान केला आहे.

पोलीसांनी बुकी अनिल जयसिंघानी, मुलगी अनिक्षा आणि त्याचा चुलत भाऊ निर्मल यांना लाच आणि ब्लॅकमेलच्या आरोपाखाली अटक केली आहे. या आरोपपत्रात १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!