Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे आकाशवणीच्या वृत्तविभागात पूर्णवेळ अधिकारी नेमून विभाग आणखी सक्षम करा

वृत्तविभाग बंद न करण्याची खासदार सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी

पुणे दि १४(प्रतिनिधी)- मुंबई नंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. कोरोना काळात अल्पावधीतच तयारी करून या केंद्राने तीन राष्ट्रीय बतमीपत्रे प्रसारित केली, ती आजही सक्षमपणे चालू आहेत. हे लक्षात घेता येथील आकाशवाणी केंद्राचा वृत्तविभाग बंद करू नये, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली असून हा विभाग अधिकाधिक सक्षम करण्यासाठी येथे पुर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, असे त्यांनी म्हटले आहे. प्रसारभारतीने आकाशवाणी, पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी उपलब्ध नसल्याने हा विभाग बंद करणार असल्याचे प्रसारभारतीने स्पष्ट केले आहे. परंतु प्रत्यक्षात भारतीय माहिती सेवेतील (आय आय एस) दोन अधिकाऱ्यांची पदे यापुर्वीच प्रसारभारतीने इतर केंद्रांवर स्थानांतरीत केली आहेत. यासंदर्भात पुणे आकाशवाणी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपल्याकडे मागणीचे निवेदन दिले आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.

पुणे आकाशवाणी वृत्तविभागामार्फत प्रसारीत होणारी बातमीपत्रे येत्या १९ जूनपासून पुणे केंद्रावर ऐकायला मिळणार नाहीत. या विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रम देखील बंद होणार आहेत. याबाबतचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील वृत्तविभाग बंद करू नये, अशी मागणी केंद्राकडे केली आहे.

पुणे वृत्तविभाग १ मे १९७५ रोजी सुरु झाला असून येथील बातमीपत्रांची लोकप्रियता संपूर्ण राज्यभरात आहे. सध्या युट्युबवरील या विभागाचे चॅनेल आणि सोशल मीडियाद्वारे ही बातमीपत्र जगभरात पोहोचतात. विविध भारतीवरील ठळक बातम्या आणि पुणे वृत्तांत या विशेष बातमीपत्राद्वारे श्रोत्यांना दरम्यानच्या काळातील ताज्या बातम्या मिळत असतात. श्रोतेही सजगपणे या बातमीपत्रांना फॉलो करत आहेत. कोरोना काळामध्ये आदेश मिळाल्यानंतर पुणे वृत्त विभागाने अल्पावधीतच तीन मराठी राष्ट्रीय बातमीपत्रे ताबडतोब पुणे केंद्रावरुन प्रसारित करण्यास सुरुवात केली. सर्व अडचणींवर मात करुन दीड वर्षांहून अधिक काळ ही कामगिरी या विभागाने करुन दाखवली आहे. अशा प्रसंगी सर्व वृत्त कारभार मुंबईसारख्या एकाच केंद्रावर एकवटल्यास कोरोनासारख्या संकटात तिथून बातमीपत्रं प्रसारित करण्यात अडचणी आल्यास पुण्यासारखा वृत्त विभाग अतिशय महत्वाचा आहे हे देखील अधोरेखित झालं होतं, असे सुळे यांनी म्हटले आहे.

हा विभाग बंदच झाला तर श्रोत्यांची देखील मोठी गैरसोय होणार आहे. मुंबई नंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. शिवाय या शहरात आकाशवाणीचे माध्यम आजही लोकप्रिय आहे. हे लक्षात घेता पुणे वृत्तविभाग बंद करु नये. उलट हा विभाग अधिकाधिक सक्षम करण्यासाठी येथे पुर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!