Latest Marathi News
Ganesh J GIF

एव्हरग्रीन अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन

पुण्यातील आंबीत घेतला अखेरचा श्वास, अनेकांनी वाहिली श्रद्धांजली, महान अभिनेत्याची दुर्दैवी अखेर

पुणे दि १५(प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत मृतावस्थेत सापडले. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. घरातून वास येऊ लागल्याने पाहिले असता ते मृतावस्थेत आढळून आले. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अभिनेते महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. त्यांच्या फ्लॅटमधून शुक्रवारी दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे. रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. सुरुवातीला नाटकात काम करुन ते चित्रपटाकडे वळले. रवींद्र महाजनी १९७५ ते १९९० या काळात चित्रपट सृष्टीत सक्रीय होते. व्ही शांताराम यांच्या झुंज चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. देखणे, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. त्यांचे देखणेपण अनेकांच्या नजरेत भरायचे. त्या काळी ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. रवींद्र महाजनी यांचा मुंबईचा फौजदार , देवता हे चित्रपट खूप गाजले. रवींद्र माहाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी संभाळण्यासाठी त्यांनी टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेतला होता. यावरून अनेकांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. दरम्यान या बातमीने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अलीकडच्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती.

महाजनी यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मराठीतील अनेक प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केलं होतं. सिनेसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसंच राजकीय क्षेत्रातूनही त्यांच्या निधनानं शोक व्यक्त करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर पोस्ट लिहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!