खळबळजनक! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू
गोळीबारात एकजण जखमी, कोळसा तस्करीतून गोळीबाराचा संशय?, आरोपीची शरणागती
चंद्रपूर दि २४(प्रतिनिधी)- चंद्रपूरातील एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीचा अज्ञाताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. या घटनामुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वाशा सचिन डोहे यांचा मृत्यू झाला आहे. तर कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले सचिन डोहे हे कोळसा व्यवसायाशी संबंधित आहेत. लल्ली शेरगिल हे त्यांच्याकडे मागील अनेक वर्ष काम करत आहेत. घटनेच्या दिवशी शेरगिल आणि हल्लेखोर यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यातून जीव वाचविण्यासाठी शेरगिल हे सचिन डोहे यांच्याकडे धाव घेतली. मात्र, यावेळी घराबाहेर असलेल्या सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वशा डोहे यांना गोळी लागली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना राजुरा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वाशा डोहे यांना मृत घोषित केले. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर लल्ली शेरगिल जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपाचर सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे गोळीबार झाल्यानंतर काही तासांतच आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मात्र पोलिसांनी आरोपीचे नाव जाहीर केलेले नाही. कोळसा तस्करीतून गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.
घटनेच्या वेळी सचिन डोहे हे त्यांचे काका माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांच्याबरोबर बाहेर गेले होते, म्हणून या गोळीबारातून ते बचावले आहेत. काही दिवसापुर्वी काँग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर देखील गोळीबार झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढल्याची चर्चा आहे.