Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबई उच्च न्यायालयातील कॅन्टीनवर FDA चा छापा; धक्कादायक माहिती समोर

आपल्या धडक आणि कडक शिस्तीच्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एफडीएच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, काल गुरुवारी एफडीएच्या पथकाने थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहांची (Canteens) धडक तपासणी सुरू केली.

या तपासणी दरम्यान एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. उच्च न्यायालयाच्या परिसरातील एका उपहारगृहाची (कॅन्टीन) अन्न व औषध प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत नोंदणीच झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कायद्यानुसार विनानोंदणी चालणाऱ्या उपहारगृहांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याने, आता एफडीए कोर्टाच्या आवारातील या कॅन्टीनवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हायकोर्टाने विचारला होता जाब: ‘मंत्रालयावर कधी छापे टाकले का?’

मंगळवारी (२८ जुलै) झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या केवळ खाजगी आस्थापनांवर होणाऱ्या कारवाईच्या धडाक्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. न्यायालयाने विचारले होते की, “आजवर किती मंत्र्यांच्या आणि सरकारी आस्थापनांवर छापे टाकले?”

तसेच केवळ खाजगी लोकांवरच नाही, तर मंत्रालयासह उच्च न्यायालय, सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांचीही तातडीने तपासणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या याच आदेशानंतर एफडीएचे पथक काल तातडीने हायकोर्टात दाखल झाले.

कोर्टाच्या ताशेऱ्यावर तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया

हायकोर्टाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, “एफडीआची कारवाई ही भारतात जो कायदा निर्माण झाला आहे, त्यानुसारच महाराष्ट्रात केली जात आहे.” त्यांनी आपल्या विभागाच्या कारवाईचे समर्थन केले असले, तरी कोर्टाच्या आदेशानंतर आता सरकारी विभागांचीही झाडाझडती सुरू झाली आहे.

दुसरीकडे तुकाराम मुंढेंविरोधात २९ कर्मचाऱ्यांचा एल्गार!

एकीकडे कोर्टातील कारवाईची चर्चा असतानाच, दुसरीकडे तुकाराम मुंढे यांच्या विभागातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील (Laboratory) तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात थेट बंड पुकारले आहे.

कर्मचाऱ्यांचे गंभीर आरोप

कर्मचाऱ्यांवर सकाळी ९ ते थेट रात्री १२ वाजेपर्यंत सलग कामाची सक्ती केली जात आहे.शनिवार, रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.या जाचक कारभाराला कंटाळून प्रयोगशाळेच्या सहसंचालकांसह सर्व २९ कर्मचाऱ्यांनी सह्यांचे लेखी तक्रारपत्र थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे सादर केले आहे. दरम्यान, या अंतर्गत तक्रारीवर तुकाराम मुंढे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!