ओैरंगाबाद दि १५(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात नव्याने बांधलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर तीन दिवसांनी एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामुळे महामार्गाच्या सुरक्षेचा मुद्दा एैरणीवर आला आहे.
महाराष्ट्राची भाग्य रेषा असे या महामार्गाचे वर्णन करण्यात आले. हीच भाग्य रेषाआता या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. समृद्धी महामार्गावरील बोगद्यासमोर चक्क फिल्मी स्टाईलने हवेत गोळीबार करतानाचा एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुण उभा असलेल्या ठिकाणी पाठीमागे एक बोगदा दिसतोय. यावरून हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी भागातील असल्याचा अंदाज आहे. हा तरुण हातात गन घेऊन महामार्गावर मध्येच उभा आहे. जीपसमोर उभा राहून तो हवेत गोळीबार करत असल्याचे दिसून येत आहे. समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणाचं नाव बाळू गायकवाड असल्याचं समोर आलं आहे. बाळू गायकवाडविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो टायगर गृपचा सदस्य असल्याचीही माहिती समोर आली आहे.
तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्चून हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. तब्बल १० जिल्हे २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणाऱ्या या महामार्गावर एकूण ५० उड्डाणपूल व ६ बोगदे आहेत. ३०० वाहनांसाठींचे अंडरपास तर ४०० पादचारी अंडरपास तयार करण्यात आले आहेत.