Latest Marathi News
Ganesh J GIF

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदूजा रूग्णालयात दाखल

तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे रुग्णालयात, जोशींवर उपचार सुरू

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत.

मनोहर जोशी हे शिवसेनेचे जुने नेते म्हणून ओळखले जातात. मनोहर जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. वयामुळे ते सध्या राजकारणात सक्रिय नाहीत. मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित विकार आहे. काल संध्याकाळी मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. याच काळात गजानन कीर्तिकर यांच्यासह शिवसेनेचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र, मनोहर जोशी, लीलाधर डाके यांच्यासारखे ज्येष्ठ नेते ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहेत.

सध्या त्यांच्यावर न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच हेल्थ बुलेटीन जाहीर केले जाणार आहे. मनोहर जोशी हे मुळचे बीडचे आहेत. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!