बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश
लोकसभेपूर्वी भाजपाच्या मिशन बारामतीला मोठे यश, प्रवेशामागे राजकारण की आणखी काही...
पुणे दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अस्तित्व संपवायचे असेल तर बारामती सुप्रिया सुळे अर्थात राष्ट्रवादीचा पराभव गरजेचा असल्याची जाणीव भाजपाला आहे.बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना रोखण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती राबवण्यात येत आहे. आता या मतदारसंघात राष्ट्रवादीचा एक मोठा नेता हाती लवकरच कमळ घेणार असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीचे पुरंदर हवेलीचे एकमेव माजीआमदार अशोक टेकवडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे यांची शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. अशोक टेकवडे यांनी गेल्या काही दिवसांपासून पुरंदरच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक पक्षीय राजकारणावर त्यांनी नाराज होते. याशिवाय अशोक टेकवडे यांचा मुलगा सरपंच होऊ नये म्हणून स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच कुरघोडी केली होती, याची सल टेकवडे यांच्या मनात होती. याबाबत त्यांनी वरिष्ठ नेत्याकडे अनेकदा तक्रार केली होती. पण योग्य प्रतिसाद न मिळाल्याने मागील काही दिवसापासून टेकवडे राष्ट्रवादीपासून अंतर राखून होते. अशोक टेकवडे यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते भाजपात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी आमदार अशोकराव टेकवडे यांचे पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांशी जमतं नव्हत. तसेच, टेकवडे यांच्या राष्ट्रवादी सोडण्यामागे आणखी काही कारणे आहेत. मध्यंतरी त्यांच्याकडे इन्कम टॅक्स विभागाचाही छापा पडला होता. असा गाैप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार टेकवडे यांच्या भाजपा प्रवेशावर केला आहे.