बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर
केंद्र व कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती
पुणे दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली.
या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
याबरोबरच दौंड तालुक्यातील रावणगाव येथे
प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी २२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता.