ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे उत्साहात स्वागत
निर्बंधमुक्त गणेश उत्सवामुळे राज्यभर गणेशभक्तांमध्ये उत्साह
पुणे दि ३१ (प्रतिनिधी)- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळख असणाऱ्या लाडक्या गणरायाचे आज वाजता गाजत स्वागत करण्यात आले. दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक मंडळांना गणेश उत्सव करण्यास मनाई होती. पण आता सार्वजनिक मंडळाच्या मंडपातही गणराय विराजमान झाले आहेत.

ढोल-ताशांच्या गजरात, आणि सनई-नगा-याच्या सुरावटीत बाप्पाचे आगमन झाले. यावे़ळी मंडळाचे कार्यकर्तेही भारावून गेले होते. यावर्षी मंगलमूर्ती मोरयाच्या स्वागतासाठी जोश, जल्लोष अन् आनंद ओसंडून वाहत होता. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला आलेल्या पावसामुळे भक्तांची थोडी तारांबळ उडाली पण उत्साह अन् चैतन्य तसूभरही कमी झाला नाही. बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने दीर्घ काळानंतर आनंदोत्सव पाहायला मिळाला. मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पाचं आगमन झालं, मात्र फारसा उत्साह नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे मळभ दूर झाल्याने भाविकांनी जोरदार उत्साहात धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. आठवडाभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती. पुढील दहा दिवस राज्यभर गणेश उत्सवाचा उत्साह राहणार आहे.
गणेश उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोलीसांनी उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी मोठा फाैजफाटा तैनात करण्यात आला आहे. यंदा कोणतेही निर्बंध नसल्यामुळे दहा दिवस पूर्ण राज्यात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घुमणार आहे.