
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी आदेश दिले होते.महाराष्ट्र दिनापासून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असे देखील त्यांनी सांगितले. आता याविरोधात रिक्षाचालक एकवटले आहेत.

मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन या रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने सरकारच्या या निर्णयाविरोधात बंड पुकारला आहे. 4 मे पासून राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.या आंदोलनामुळे सेवा विस्कळीत होण्याची आणि रस्त्यांवरील रिक्षांची संख्या लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता संघटनेने वर्तवली आहे.

युनियनच्या नेत्यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये एकट्या मुंबई महानगर प्रदेशातील 5 लाख चालकांचा समावेश आहे. सरकारने हा आदेश मागे न घेतल्यास दररोज निदर्शने केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.आंदोलन सुरू करण्यापूर्वी, युनियन 28 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देणार आहेत. १ मे पासून हा नियम लागू होण्यापूर्वीच तो मागे घेण्यात यावा, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.


