Latest Marathi News
Ganesh J GIF

पोलिसांच्या वेतनावर डल्ला मारणाऱ्या ‘टोळी’चा पर्दाफाश; PSI सह ४ जणांवर गुन्हा!

रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन विभागात तब्बल २ कोटी ३८ लाख ९२ हजार रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, लातूर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

१० वर्षांपासून सुरू होता खेळ

हा घोटाळा काल-परवाचा नसून, मे २०१५ ते मार्च २०२५ या तब्बल १० वर्षांच्या कालावधीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला आहे. वेतन विभागातील महत्त्वाच्या शीर्षांमध्ये फेरफार करून ही रक्कम लाटण्यात आली.इंटेन्सिव्ह, बेसिक एरर, स्पेशल पे आणि रेफरन्स अलाउन्स यांसारख्या तांत्रिक बाबींमध्ये खडाखोड करून सरकारी रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवण्यात आली.तपासात समोर आले आहे की, आरोपींनी संगनमत करून ३६८ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बनावट कागदपत्रांच्या आधारे अतिरिक्त रक्कम काढली.

कोणाच्या खात्यात किती रक्कम गेली?

प्राथमिक तपासाअंती आरोपींच्या खात्यात जमा झालेली रक्कम पाहून पोलीसही थक्क झाले आहेत
ब्रिजकिशोर ठाकूर: १ कोटी २३ लाख ३६ हजार रुपये.
राहुल वागदरे: ९० लाख ५७ हजार रुपये.
दत्तात्रय शिरसागर: ४८ लाख ९८ हजार रुपये.
अजय सूर्यवंशी (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक): यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल.

प्रशासकीय यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह!
हा घोटाळा उघड झाल्यानंतर लातूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे, पण काही गंभीर प्रश्न अनुत्तरित आहेत २०१५ पासून हा प्रकार सुरू असताना दरवर्षी होणाऱ्या लेखापरीक्षणात हा अडीच कोटींचा झोल का दिसला नाही? ३६८ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जेव्हा अतिरिक्त रक्कम जमा होत होती, तेव्हा एकानेही तक्रार का केली नाही? रक्कम परत करताना गडबड: अतिरिक्त रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्याऐवजी ती परस्पर आरोपींच्या खात्यात कशी काय गेली?

अधीक्षकांचा ‘ॲक्शन मोड’

या प्रकरणाची कुणकुण लागताच लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास आता पोलीस उपाधीक्षकांकडे सोपवण्यात आला असून, वरिष्ठ स्तरावरूनही सखोल चौकशीची मागणी होत आहे.

“माहिती समोर आल्यानंतर आम्ही तातडीने गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही.”

— अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!