Latest Marathi News
Ganesh J GIF

मरणाची भीती, कोटींची लूट अन् आलिशान थाट; खरातच्या पापाचा घडा भरला

‘अध्यात्म’ आणि ‘मृत्यूच्या भीती’चा बाजार मांडून भक्तांना लुटणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’ आता खरातचा ताबा घेण्याच्या तयारीत असून, त्याच्या आर्थिक साम्राज्याची मुळं खणून काढण्यास सुरुवात झाली आहे.

अशोक खरातने स्वतःला आध्यात्मिक गुरू भासवून हजारो भक्तांना जाळ्यात ओढले होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात भक्तांना ‘मरणाची भीती’ दाखवून महागड्या पूजा करण्यास भाग पाडायचा. परदेशात पूजा करण्याच्या नावाखाली त्याने कोट्यवधी रुपये उकळले.केवळ रोकडच नव्हे, तर भक्तांकडून महागड्या आलिशान गाड्या आणि मोक्याचे प्लॉटही स्वतःच्या नावावर करून घेतले.

खरातने जमवलेला हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक ‘शेल’ (बनावट) कंपन्या स्थापन केल्याचा संशय ईडीला आहे.बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्ता खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.ईडीने आता खरातचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला असून, लवकरच त्याची सखोल चौकशी होणार आहे.

या प्रकरणात एक मोठे राजकीय वळणही पाहायला मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची रविवारी (१० मे) एसआयटीने तब्बल ६ तास चौकशी केली.महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा आणि खरातशी संबंधित असलेल्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी चाकणकर यांना धडाधड प्रश्न विचारत अनेक मुद्द्यांवर खुलासे मागितले.

“मी सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आहेत. पोलिसांना तपासात जे काही सहकार्य लागेल, ते मी पूर्णपणे करेन.”
— रुपाली चाकणकर (चौकशीनंतरची प्रतिक्रिया)

ईडीच्या तपासात आता हे पाहिले जाईल की, खरातच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचले आहेत का? तसेच, या लुटीच्या व्यवसायात त्याला आणखी कोणत्या बड्या हस्तींचे ‘वरदहस्त’ लाभले होते, हे देखील आता उघड होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!