
‘मराठ्यांना हक्काच आरक्षण द्या आता नाही तर कधीच नाही’
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, आता तमाशा कलावंतही मराठा आरक्षणासाठी सरसावले, कोणी दिला पाठिंबा
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अनेक ठिकाणी आंदोलक हिंसक रुप घेत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आंदोलन सुरु केले आहे. त्यांना विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कला क्षेत्रातून देखील पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री आश्विनी महांगडे हिने पाठिंबा दिला आहे. आश्विनीने यावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. आता नाही तर कधीच नाही. विद्यार्थी,स्वप्नं, मेहनत, परीक्षा, उत्तिर्ण, यश, तरीही अपयश, मग आक्रोश, यातना, मग परत परीक्षा, मग परत सगळे तेच आधीचे पाढे आणि मग आत्महत्या. हे गेले किती तरी वर्ष सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही यासाठी उभे राहायला हवे. या लढ्यात मी भाग होणे हे माझे कर्तव्य आहे”, अशी पोस्ट आश्विनीने केली आहे. अश्विनीने मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाच्या वाई तालुक्यातील साखळी उपोषणात सहभागी होत पाठिंबा दर्शविला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आश्विनी म्हणाली की, मराठा क्रांती मोर्चामध्ये मी आधीपासूनच सहभागी आहे. ही लढाई यावर्षी सुरू झाली असं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. माझा ज्या परिसरात जन्म झाला तिथे आठवी-दहावीनंतर मुलं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी ते घेत असलेली मेहनत मी पाहिली आहे. आजही ९० टक्क्यांपेक्षा जास्त टक्के असणारा विद्यार्थी भरती होत नाही. तर ६०% मिळवणारा विद्यार्थी भरती होतो. त्यामुळे आम्हाला आमचे स्वतंत्र आरक्षण हवे आहे. कारण आरक्षण ही खरचं काळाची आणि मराठा मुलाची आणि मुलीची गरज आहे आणि ते व्हायला हवं”. असे ती म्हणाली आहे. विशेष म्हणजे मराठी आरक्षणाला आता तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. पुढील १५ दिवस तमाशाचे कार्यक्रम करणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याशिवाय अभिनेता रितेश देशमुख आणि कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनीही मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
अश्विनी महांगडे अभिनया व्यतिरिक्त नेहमीच सामाजिक कार्यांमुळे चर्चेत असते. शिवाय शिवप्रेमी अश्विनी गड, किल्ले यांच्या संरक्षणाचे धडेही देताना दिसते. अश्विनीच्या उपोषणात दर्शविलेल्या पाठिंब्याबद्दल तिचं अनेकांनी कमेंट करत कौतुक केलं आहे. दरम्यान मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी हिंसक आंदोलन केले जात आहे.