हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ; हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांकडून मंत्रीपदाचे संकेत, हर्षवर्धन पाटील बारामतीचेच जावई – शरद पवार
हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलच हर्षवर्धन पाटलांनी लोकसभा निवडणुकीत आपण सुप्रिया सुळेंसाठी गुपितपणे काम केल्याचं म्हटलं. तर, शरद पवारांनीही हर्षवर्धन पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळत ते बारामतीचेच जावई आहेत, आम्ही कुणालीही आमच्या मुली देत नाहीत, असे म्हटलं.
यावेळी, इंदापूरच्या जनतेला आवाहन करताना, तुम्ही हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा, राज्याची जबाबदारी द्यायचं काम माझं, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना मंत्रीपदाचे संकेत दिले आहेत.शरद पवार म्हणाले, ” हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं काहीही काम द्यावं. पण काहीही कामासाठी हर्षवर्धन यांची गरजच काय, लोकांच्या हिताचं काम, कठीण कामे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे द्यायला पाहिजेत. त्यासाठी, तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. मला स्वतःसाठी काहीही मागायचं नाही, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे.त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवायचे तुमचं काम, राज्याची जबाबदारी काय द्यायची ही माझी जबाबदारी, असे म्हणत महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मंत्रिपदाचे संकेतही शरद पवारांनी दिले आहेत.
ते पुढे म्हणाले, “काहीजण लोकं मला विचारत होते, कसं होणार, काय?, पण मी म्हटलं, काही काळजी करू नका, जावई कुणाचाय?”, शरद पवारांनी असं म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. तसेच, “आम्ही चांगलं घर बघूनच मुलींना देत असतो, त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालंय, संसार नीट करणारा, महाराष्ट्राचा संसार नीट सांभाळणारा हा जावई आहे, जो बारामतीकरांनी तेव्हाच पाहिला होता”, असे म्हणत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक केले.