Latest Marathi News
Ganesh J GIF

खासदार सुप्रिया सुळे विरोधातील भाजपाचा उमेदवार ठरला?

अजित पवारांच्या साथीने भाजपा बारामतीचा गड जिंकणार, 'ही' व्यक्ती लढणार निवडणूक?

बारामती दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. पण शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची ताकत दुभंगली आहे. त्यातच सुप्रिया सुळे या पवारांसोबतच असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरोधातील उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारामती हा पवार कुटुंबाचा गड राहिला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून बारामतीवर पवार कुटुंबाची घट्ट पकड आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर शरद पवार आणि आता सुप्रिया सुळे कायम विजय मिळवत आलेल्या आहेत. पण आता अजित पवार यांनी भाजपाला साथ दिल्याने काही समीकरणे बिघडली आहेत. त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील राजकीय लढाई कायम राहिल्यास बारामतीमधून उमेदवारी कोणाला मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघावर विजय मिळवण्याचा भाजपाचा कायम प्रयत्न राहिला आहे. आता पवारांची साथ मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या पसंतीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आता बदललेल्या समीकरणानंतर सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पार्थ पवार हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. मावळ मधील पराभवानंतर पार्थ पवार यांच्यासाठी मतदारसंघाचा शोध सुरु होता, पण आता त्यांना बारामतीतुन उभे करून, पवार कुटुंबातील फुटीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजपाचा असणार आहे. अर्थात अशी फक्त चर्चा सुरु असुन या शक्यतेची चाचपणी केली जात आहे.

पुढच्या काही दिवसात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणाची? यासाठी दोन्ही गट निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात. त्याशिवाय न्यायालयीन लढाई सुद्धा लढली जाण्याची शक्यता आहे. काका पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार हे आगामी घडामोडीनंतर स्पष्ट होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!