
पुण्यातील गणेश पेठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वडापाव खरेदी करताना अनावधानाने एकमेकांच्या पायाला पाय लागल्याच्या एका अगदी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका २८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

नक्की काय घडलं?

गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकातील एका वडापावच्या गाडीवर शिवम परदेशी (वय २८) आणि वैभव साळुंखे हे दोघेही वडापाव घेण्यासाठी गेले होते. दोघेही एकाच परिसरातील रहिवासी असून त्यांची एकमेकांशी तोंडओळख होती. वडापावच्या गाडीवर गर्दी असताना अचानक अनावधानाने वैभवच्या पायाला शिवमचा पाय लागला. या किरकोळ गोष्टीवरून दोघांमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाली.

छातीवर मारल्या बुक्क्या; अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू!
वादाच्या भरात रागाच्या भरात आलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर जोरदार बुक्क्या मारण्यास सुरुवात केली. मारहाण एवढी गंभीर होती की शिवमच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव (Internal Bleeding) सुरू झाला. गंभीर जखमी झालेल्या शिवमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
दोन्ही कुटुंबे सर्वसामान्य; परिसरात हळहळ
विशेष म्हणजे, मृत शिवम आणि आरोपी वैभव हे दोघेही अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. दोघांचेही वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात. आरोपी वैभव एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरी करतो. अवघ्या एका क्षणभराच्या रागामुळे दोन्ही कुटुंबे उध्वस्त झाली असून गणेश पेठ परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांचा तपास सुरू
फरासखाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या हत्येमागे केवळ हाच वाद होता की काही जुने पूर्ववैमनस्य होते, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

