कोल्हापूर दि ५ (प्रतिनिधी) – डॉक्टरांसमोर रुग्ण बसला असतानाच अचानक हार्ट अटॅक आला. मात्र, डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने रुग्णाचे प्राण वाचले. अशी एकदम चित्रपटाला साजेशी घटना कोल्हापूरात घडली आहे. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अर्जुन अडनाईक यांच्या रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
कोल्हापूरमधील अडनाईक यांच्या रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईक डॉक्टरांशी चर्चा करत असतानाच अचानक एक जणाला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्ण खुर्चीतच अस्वस्थ झाला. यावेळी प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी त्याच्या छातीवर हाताने हलकेसे ठोके देत त्याचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये रुग्ण आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरांसोबत चर्चा करत आहेत. इतक्यात रुग्णाला प्रचंड अवस्वस्थ वाटू लागतं. हे पाहताच डॉक्टर क्षणाचाही विलंब न करता रुग्णाजवळ जाऊन त्याला मृत्यूच्या दारातून परत आणले. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी डॉक्टरांचं कौतुक केले आहे.
आपण सर्दी-ताप जरी आला तरी डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. डॉक्टर म्हणजे देवदूत असतात. डॉक्टर जणू नवीन आयुष्यच देत असतात. कोल्हापूरातील घटनेमुळे याचा प्रत्यय आला आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.