पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या दोन बसेसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे-नगर महामार्गावरील बीआरटीमध्ये ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये बसच्या वाहक आणि चालकासह २९ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दोन्ही बसेसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुणे बीआरटीची चर्चा सुरु झाली आहे.
तळेगाव ढमढेरे ते मनपा ही बस पुण्याकडे येत होती. तर दुसरी बस वाघोलीच्या दिशेने जात होती. यावेळी वाघोलीकडे जाणारी बस वेगात येऊन समोरुन येणार्या सीएनजी बसला धडकली. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. अपघातामध्ये २९ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसच्या काचा फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून व मिळेल त्या वाहनांमधून जखमींना ससून रुग्णालयात नेण्यात आले. सर्वांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातानंतर पुणे- नगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त बस बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. या बस समोरासमोर येऊन एकमेकांना इतक्या जोरात आदळेपर्यंत चालकांना कसे लक्षात आले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पीएमपीएल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींमध्ये आठ महिलांचा समावेश असून सतरा प्रवासी व दोन्ही चालक व दोन्ही वाहक आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणाने घडला हे अद्याप समजू शकलेले नाही.