भीषण! समृद्धी महामार्गावरील अपघातात १८ जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबेना, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, मृत्यूचा महामार्ग?
ठाणे दि १(प्रतिनिधी)- समृद्धी महामार्गावर सुरू असलेले अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसापुर्वीच समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशातच समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाला आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने १८ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरळांबे येथे पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळून मोठी दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पावसाने उघडीप दिल्याने या पुलाचे काम रात्री देखील सुरू होते. साडेबाराच्या सुमारास अचानक गर्डर खाली आला आणि त्याखाली कामगार सापडले, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काहीजण मशीनखाली अडकले आहेत, पण या मशीन खाली किती जण दबले गेले आहेत याची निश्चित माहिती सांगणे सध्या कठीण आहे. बचावकार्य मात्र वेगात सुरू आहे. दरम्यान मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. दादा भुसे यांनी अपघात स्थळी भेट देऊन पाहणी करत ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. हा ब्रीज सुमारे ९० ते १०० फूट उंचीचा असून, नवयुगा या कंपनीला या पुलाचे कंत्राट देण्यात आलेले आहे. या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं म्हटलं जात आहे.
समृद्धी महामार्गावरील दुर्घटना आणि अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. मृतांमध्ये बहुसंख्य मजूर हे युपी आणि बिहारमधील असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या अपघातानंतर पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग हा मृत्यू मार्ग तर ठरत नाही ना हा प्रश्न निर्माण झाला आहे.