पुणे-सोलापूर हायवेवर उरुळी कांचनला भीषण अपघात
दोन कंटेनरच्या धडकेत विरुद्ध दिशेच्या कारलाही उडवले, एकाचा मृत्यू
पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पहाटे तीन वाहनांचा झालेल्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एक कंटेनर हा पुण्याच्या बाजूने निघाला होता. यावेळी एलाईट चौक आणि तळवडी चौक या दोन्ही चौकांच्यामध्येच कंटेनरला पाठीमागून आलेल्या आणखी एका कंटेनरला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो कंटेनर दुभाजकावरुन सोलापूर दिशेला गेला आणि त्याने एका चारचाकीला धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला.अपघातात चारचाकी गाडीचे व कंटेनरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण पोलिसांची मदत उशीरा पोहोचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. जखमींना तात्काळ उपचारासाठी उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण उरुळी परिसरात पुन्हा एकदा अपघातात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.