Latest Marathi News
Ganesh J GIF

राष्ट्रवादीत नवरा भाजपात बायको पण ग्रामपंचायतीत गुलाल बीआरएसचा

बीड जिल्ह्यात प्रस्थापितांना धुळ चारत बीआरएस विजयी, पती पत्नी एकत्र आले आणि सासू झाली सरपंच

बीड दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. पण बीड जिल्ह्यात मात्र राज्यातील पक्षांच्या गर्दीत शेजारील राज्यातील पक्षाने प्रवेश करत सत्ता स्थापन केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसने आपले खाते उघडले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीत कोणताही पक्ष थेट निवडणुक लढवत नाही. पण अनेकजण विजयी झालेले उमेदवार आपलेच असल्याचा दावा करत असतात. पण हे होत असताना बीआरएस पक्षाने बीडमध्ये आपले खाते उघडले आहे. कारण गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीत बीआरएसने सर्वच्या सर्व ९ जागा जिंकल्या. शशिकला भगवान मस्के या बीआरएसच्या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. या निवडीत महत्वाचा फॅक्टर हे उमेदवारांचे अनोखे पक्षांतर ठरला आहे. कारण मूळचे अजित पवार यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब म्हस्के हे राष्ट्रवादीत होते. त्यांची पत्नी मयूरी खेडकर मस्के या भाजपमध्ये होत्या. मात्र दोघांनी काही महिन्यांपूर्वीच बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मयूरी यांच्या सासूबाई शशिकला मस्के यांना सरपंचपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे म्हस्के यांचे एक उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते. ८ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे गेले. ते सर्वच्या सर्व निवडून आले. सरपंचपदाच्या उमेदवार शशिकला मस्के या तब्बल ८०० मतांनी विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया मयूरी मस्के यांनी दिली आहे. त्याचबरोबर गावच्या विकासाला प्राधान्य, प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणी आपल्या मानून काम करु असंही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात त्यांचा बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. आजच्या ग्रामपंचयातीच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला राज्यात पसंती मिळत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

बीआरएसने राज्यातील १० ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे. यात बीडमधील रेवकी ग्रामपंचायत आणि भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएसचा झेंडा फडकावला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह आता बीआरएस पक्षानेही यश मिळवत आपली उपस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दाखवली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!