चारित्र्याच्या संशयातून पत्नीचे भिंतीवर डोकं आपटत निर्घुन खून
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीवर पतीचा संशय, हत्या करून केलेला बनाव फसला, दिपालीसोबत काय घडलं?
सातारा दि ७(प्रतिनिधी)- पती पत्नीचे नाते विश्वासावर अवलंबून असते. पण एकदा का या नात्यात संशयाने शिरकाव केला तर मात्र नात्यात दुरावा निर्माण होतो. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. म्हसवड शहरात २९ वर्षीय विवाहितेची दारूच्या नशेतील तिच्या पतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून भिंतीवर डोके आपटून तिचा निर्घृण खून केला आहे.
दीपाली धोंडीराम पुकळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दीपाली धोंडीराम पुकळे हिचा विवाह धोंडीराम पुकळे याच्याबरोबर झाला होता. दीपाली आणि धोंडीराम या दोघांना दोन मुले आहेत. दीपाली ही एमपीएससीचा अभ्यास करत होती. धोंडिराम शनिवारी रात्री दारू पिऊन आला. दीपाली हिच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात धोंडीराम याने दीपालीचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटले. यामध्ये दीपालीच्या कानातून व नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. तरीही त्याने तिला बेडवर झोपवले. सकाळी मुले उठल्यानंतर धोंडीरामनेच चहा-बिस्किटे दिली. मुले आईला उठवत असताना रोज भांडणे झाल्यावर रागा रागाने आई झोपते त्याप्रमाणे झोपली असेल असे मुलांना वाटले. त्यानंतर अकराच्या सुमारास मुलांना बाहेर खेळाला पाठविले. धोंडिरामही दुपारी दोनच्या दरम्यान घराबाहेर गेला. त्यावेळी मुले घरी आली. त्यांनी आईला उठवले. मात्र, आई उठत नाही म्हणून ती रडू लागली. त्यानंतर शेजारी राहणारे लोक तेथे जमा झाले. याबाबत कोडलकरवाडीच्या तिच्या आई-वडिलांना माहिती देताच ते घटनास्थळी आले. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत मुलीच्या वडिलांना पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पती पत्नीच्या नात्यात संशयाचे वादळ निर्माण झाल्याने दोन मुले आता आईच्या प्रेमाला मुकली आहेत.
पत्नीचा खून करून पती एका ठिकाणी दडून बसला होता. त्याला पोलिसांनी शिताफीने पत्नी दीपाली हिचा खून केल्याप्रकरणी अटक करून ताब्यात घेतले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ खुनाचा अधिक तपास करत आहेत.