पतीने कर्ज काढून पत्नीला शिकवले पण पत्नीने दिला धोका
नोकरी लागताच पती सोबत राहण्यास नकार देत पत्नी फरार, पतीचा न्यायासाठी लढा
रांची दि ८(प्रतिनिधी)- सध्या यूपी पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य यांचे प्रकरण चर्चेत आहे. याच धर्तीवर साहिबगंज येथील रहिवासी असलेली कल्पना आपल्या बेरोजगार पतीला सोडून पळून गेली आहे. बांझी बाजार येथील रहिवासी असलेल्या कन्हाई पंडितचे सुमारे १४ वर्षांपूर्वी कल्पना देवी नावाच्या तरुणीशी लग्न झाले होते. पण आता ती फरार आहे.
झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील बांझी बाजार येथील कन्हाई पंडित यांचे लग्न २००९ मध्ये कल्पना कुमारी हिच्याशी झाले होते. लग्नानंतर कल्पनाने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. पतीनेही होकार दिला. पत्नीला आधी महाविद्यालयीन आणि त्यानंतर नर्सिंगचे शिक्षण दिले. यासाठी पतीने कर्जही केले, पण कल्पनाचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कल्पनाने जुमावती नर्सिंग होममध्ये कामास सुरुवात केली. दुसरीकडे कन्हाई ट्रॅक्टर चालवून आणि मोलमजुरी करून कर्जाची परतफेड करत होता. पण गावात राहून कर्ज फेडता येणार नाही असे म्हणत कल्पनाने पतीला गुजरातला काम करण्यास सांगितले. कोरोना काळातही पत्नीच्या विरोधामुळे तो गावी न येता गुजरातलाच थांबला पण एप्रिल मध्ये तो परत आल्यानंतर पत्नीच्या वर्तनात त्याला बदल दिसून आला. त्यानंतर १४ एप्रिल रोजी कल्पना मुलाला आणि घरातील दागिने आणि २८ हजार रुपये घेऊन फरार झाली आहे. पत्नीच्या नर्सिंग शिक्षणासाठी दोन लाख रुपयांची फी भरली. या काळात कर्जबाजारी झालो. मला मजूर म्हणून गुजरातला जावे लागले. पण आता ती गेल्यानंतर सासरचे लोकही बायकोबद्दल काहीच सांगत नसल्याची खंत पतीने व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे.
पीडित कन्हाई यांनी जिल्हा न्यायालय, उपायुक्त आणि एसपींकडे तक्रार केली असून न्यायाची मागणी केली आहे. पत्नीला शिकवण्यासाठी जो खर्च झाला तो आपल्याला परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तर कन्हाई त्यांच्या मुलीला मारहाण करायचा. हुंड्यासाठी दबाव आणायचा, असा आरोप कल्पनाच्या पालकांनी केला आहे.