‘महाविकास आघाडी तुटल्यास आमचा वेगळा प्लॅन तयार’
अजित पवार मुख्यमंत्री चर्चेमुळे काँग्रेस नाराज, स्वबळाचा सुचक इशारा
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीला एकत्र बांधून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने पुढाकार घेत आगामी निवडणुकांत मविआची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला सीएम पद देण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर मोठं भाष्य केलं आहे. पटोले म्हणाले, सध्यातरी निवडणुका होणार नाही. त्यांना अजून अवकाश आहे.त्यामुळे मुख्यमंत्री पदावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण महाविकास आघाडी म्हणून आम्हांला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे आहे. महाविकास आघाडीत ज्याच्या जागा जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री होईल. आणि महाविकास आघाडी जरी नसेल तरी आमचा पुढील सर्व प्लान तयार असल्याची अशी स्पष्ट भूमिकाही पटोले यांनी यावेळी मांडली आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभांना प्रतिसाद मिळत असताना अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच आगामी निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे असेही अजित पवार म्हणाले होते. त्याचबरोबर शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर ठाकरे गटाने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला होता. पण या प्रस्तावाला काँग्रेसने खो दिला आहे.
राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. हे सगळं राज्याला लाजवणारे आहे. सीरियस सरकार नाही. जनतेची तिजोरी लुटणारं सरकार आहे. अशी टिका पटोले यांनी केला आहे. दरम्यान नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादी-शिवसेनाकडून काय उत्तर येतं हेचं पाहणं महत्वाचं आहे.