‘भाजपचा सरपंच निवडून न आल्यास एका रुपयाचा निधी देणार नाही’
भाजप आमदार नितेश राणेंची मतदारांना धमकी, व्हिडिओ व्हायरल
सिंधुदूर्ग दि १२(प्रतिनिधी)- सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. यामुळे नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. पण नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. तुमच्या गावात माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधीच देणार नाही, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वादंग निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी नितेश राणे हे नांदगावमध्ये प्रचाराला आले होते. यावेळी मतदारांसमोर भाषण करताना अचानक धमकीच दिली ते म्हणाले आता कोणत्या गावाला निधी द्यायचा, कोणत्या नाही हे माझ्या हातात आहे. त्यामुळे मतदान करतानाच विचार करा. जर माझ्या विचारांचा सरपंच तुमच्या गावात निवडून आला तरच निधी देईल. चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही देणार नाही. याची पुरेपूर काळजी मी घेईन. जिल्हा नियोजन, ग्रामविकास, २५:१५ निधी असो किंवा केंद्र सरकारचा निधी असो. हा निधी कोणाला द्यायचा त्याची सर्व सूत्रं माझ्या हातात आहेत. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री, कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. याला तुम्ही धमकी समजा किंवा काहीही समजा, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. विरोधकांनी राणेंवर टिका करताना त्यांचा हा माज जनता नक्की उतरवेल असा इशारा दिला आहे. राणे यांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजपाची बिनविरोध ग्रामपंचायत येईल त्या गावाला ५० लाखाचा निधी देऊ अशी ऑफर काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी एका गावाला दिली होती. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर टिका करताना हा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत टिका केली आहे. आता मतदार काय उत्तर देणार जे पहावे लागणार आहे.