हडपसरमध्ये आजारी पाळीव मांजरीचा उपचारादरम्यान मृत्यू
संतप्त महिलेसह चौघांची डाॅक्टरांना मारहाण, रुग्णालयाची तोडफोड
पुणे दि १२(प्रतिनिधी)- आजवर रूग्णालयात एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड आणि डाॅक्टरला मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत पण पुण्यात पाळीव मांजराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एका महिलेसह चौघांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. आरोपींनी रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली.या प्रकरणी एका महिलेसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पशू वैद्य डॉ. रामनाथ बापू ढगे असे जखमी फिर्यादी डॉक्टरचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर मंत्री मार्केट येथे पशू वैद्य डॉ. रामनाथ ढगे यांचा डॉग ॲण्ड कॅट नावाचा दवाखाना आहे. रविवारी एक महिला आणि चार अनोळखी जण त्यांच्या पाळीव मांजरावर उपचार करण्याकरिता दवाखान्यामध्ये घेऊन आले. मांजरावर ऑपरेशन करावयाचे होते, मात्र उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या मांजरीच्या मालकीन आणि तिच्या पतीने तीन मुलांना बोलावून घेतले त्या चौघांनी डाॅ. ढगे यांना मारहाण केली. मारहाणीत डाॅ. ढगे यांचा पाय फ्रॅक्चर झाला. रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी मारहाणीची घटना टिपली असून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपींनी दवाखान्यामधील वस्तूंची तोडफोड केली. अशी फिर्याद डॉक्टरांनी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केल्याने महिला व चार अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत.