
‘दम असेल त्यांनी आपल्या केसालाही धक्का लावून दाखवावा’
'या' बंडखोर मंत्र्यांनी दिले शिवसेनेला ओपन चॅलेंज
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- पुण्यात एका कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उदय सामंतांनी हजेरी लावली होती. यावेळी सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सामंतांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. या घटनेनंतर सामंतांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. या सभेला शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता पुन्हा त्या हल्ल्याची आठवण करत उदय सामंतांनी हल्लेखोरांना आव्हान दिले आहे.
उदय सामंत म्हणाले की, “येत्या १५ दिवसांमध्ये ज्या ठिकाणी आपल्यावर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी एकटा जाऊन सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर ज्यांच्यामध्ये दम आहे त्यांनी आपल्या केसालाही धक्का लावून दाखवावा”, असा इशाराही त्यांनी हल्लेखोरांना दिला आहे. ‘जन्म दिलेल्या आईचं दूध विकलं’ अशा शब्दात माझ्यावर टीका झाली. मी हे सर्व डोक्यात ठेवलेलं आहे. याचं उत्तर दोन वर्षानंतर एप्रिल २०२४ ला देणार आहे. ते उत्तर मी जर मी दिलं नाही, तर राजकारणातून निवृत्ती घेईन, अशा इशाराही सामंतांनी अप्रत्यक्षपणे विनायक राऊत यांना दिला.
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाकडून बंडखोर आमदारांवर गद्दार म्हणत टीका करण्यात येत आहे. तर काही दिवसांपूर्वी पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर उदय सामंतांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे. त्यामुळे पुण्यात वादाचा दुसरा अंक सुरु होण्याची शक्यता आहे.