
‘जाे आडवा येईल त्याला जेसीबीच्या खाली घ्या, पुरुन टाका’
बीडमध्ये सरकारी अभियंत्याची गावकऱ्यांनी धमकी, धमकीचा व्हिडिओ व्हायरल
बीड दि २८(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धारूर पंचायत समितीच्या वतीने जहागीर मोहा या गावात खडीकरणाचे काम व मुरमाचे काम सुरु आहे. यावेळी पंचायत समितीच्या अभियंत्याने दादागिरी केल्याचे समोर आले आहे.
धारूर पंचायत समितीच्या वतीने जहागीर मोहा या गावात खडीकरणाचे काम आणि मुरमाचे काम धनगर वस्ती रोडवर सुरू आहे. रस्त्याचे काम चांगले करावे, अशी मागणी करण्यासाठी गावकरी गेले असताना गावकऱ्यांचे म्हणणे एैकून घेण्याएैवजी पंचायत समितीच्या अभियंत्याने गावकऱ्यांना “जाे कोणी कामाच्यामध्ये येईल त्याला जेसीबीच्या खोऱ्या खाली घे त्यांना पुरून टाक” अशी धमकी दिली या धमकीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सय्यद मुजाहिद, असे या मुजोर अभियंत्याचे नाव आहे. गावकऱ्यांनी या अभियंत्याविरोधात धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे तक्रारीत अभियंताकडे पिस्तूल असून पिस्तुलीचा धाक देखील दाखवत असल्याचे म्हटले आहे. पण या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाराकिरीचे प्रकार समोर आले आहेत.राज्यात आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख पुढे येते. मात्र, त्याच बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात, स्वर झंकार कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या हिंदी गाण्यांवर धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.