‘मुस्काटदाबीने होणारे बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण तातडीने थांबवा’
आंदोलकाशी समन्वय साधून संवादातून मार्ग काढण्याचे अजित पवार यांचे आवाहन
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- रत्नागिरीतील बारसु रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात येत आहे. या मुस्कटदाबी, धमकीसत्राचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करावा, पोलिसांची दडपशाही थांबवावी, हे आंदोलन मानवी दृष्टीकोनातून संवेदशीलपणे हाताळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच विकासाची भूमिका घेतली आहे, परंतु विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. स्थानिक भूमीपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं. स्थानिक ग्रामस्थ, तरुण, महिलावर्गावर पोलिसांकडून दडपशाही करण्यापेक्षा समन्वय, संवादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. दरम्यान कोकणातील बारसू येथे स्थानिक रिफायनरीला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी त्यातील काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस.आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे.खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 25, 2023
अजित पवार म्हणाले की, समृद्धी महामार्गालाही लोकांचा विरोध होता. पण चर्चा झाली त्यातून मार्ग निघाला. तशा प्रकारे या प्रकल्पाबाबत वेगवेगळं मत व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणी मुस्कटदाबी होऊ नये. संमतीने जे काही व्हायचं ते व्हावं. आम्ही विकासकामाला विरोध करत नाही. अशी भूमिका मांडली.