शिंदे गटातील मंत्र्यासमोरच पन्नास खोके मंत्री ओकेच्या घोषणा
वाढता विरोध पाहत मंत्र्यांचा काढता पाय, व्हिडिओ व्हायरल
धुळे दि ३ (प्रतिनिधी) – शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे आज धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना त्यांची नाचक्की करणारा प्रसंग घडला आहे. त्यांच्या दौर्यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन करत असताना शेतकर्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवलेच पण त्या बरोबर पन्नास खोके मंत्री ओके अशा जोरजोरात घोषणा देत भुसे यांचा निषेध केला.
शेतक-यांची घोषणाबाजी सुरु असताना भुसे यांनी तात्काळ त्यांच्याविरोधात घोषणा देणा-या आणि काळे झेंडे दाखवणा-या शेतकर्यांना समजूत घालण्यासाठी जवळ बोलावले. मात्र, या शेतकऱ्यांनी भुसे यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. आणि आपली घोषणाबाजी सुरूच ठेवली. ठाकरे सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले भुसे यांना शिंदे गटात सामील झाल्यानंतर खनिज मंत्रालय देण्यात आले आहे. कमी महत्वाचे खाते दिल्याने भुसे देखील नाराज आहेत.पण आता शेतकऱ्यांनीही त्यांना विरोध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांची मागच्या अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांच्यासोबत ते शिंदे सोबत गेल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. पण शिंदे यांच्या बंडखोरीनंतर काहीनी एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे समर्थन केले तर काहीनी शिंदे गटाच्या विरोधातही प्रतिक्रिया दिल्या. पण शिंदे गटाला होणार विरोध अधिक आहे. त्याचाच फटका भुसे यांना बसला आहे.