शिवसेना आमचीच म्हणत ठाकरे शिंदे गटात जोरदार हाणामारी
हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल,पोलिसांना करावा लागला बळाचा वापर
बुलढाणा दि ३ (प्रतिनिधी)- खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. पण त्यावरून नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कायम एकमेकांवर आरोप करत खरी शिवसेना आमचीच असा दावा उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे या दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. दोन्ही गटाने आपापले पदाधिकारी नेमण्यास सुरूवात केली आहे. पण बुलढाण्यात शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे तूफान राडा झाला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षातील फूट भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून जिल्ह्यात नव्या पदाधिकारी नेमणुका सुरू आहेत. बुलढाण्यातही उद्धव ठाकरेंकडून नवीन पदाधिकारी नेमले होते. या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उद्धव ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आला होता. पण बंडखोर आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी सत्कार कार्यक्रमात जोरदार राडा घातला. त्यामुळे ठाकरे गटही त्यांना जोडला.यावेळी खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. यात काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर घडला. पोलिसांनी या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण दोन्हीकडचे कार्यकर्ते आक्रमण झाल्याने पोलिसांना त्यांना आवरण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली. अखेर सौम्य लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना हटवावे लागले. या घटनेचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. त्यानंतर खरी शिवसेना ठाकरेंची की शिंदेची हा वाद सुरु आहे.यासाठी घटनापीठाकडे सुनावणी सुरु आहे.पण कार्यकर्ते हातगाईवर आल्याने हा संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे.