कसब्यात विजय काँग्रेसच्या धंगेकरांचा चर्चा मात्र बिचुकलेची
मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेल्या अभिजित बिचुकलेंना कसब्यात किती मते? बघा आकडा
पुणे दि २(प्रतिनिधी)- अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तर भाजपाचे हेमंत रासने पराभूत झाले आहेत. भाजपाचा बालेकिल्ला तब्बल ३० वर्षानंतर खालसा केला आहे. पण आता चर्चा मात्र अभिजित बिचुकलेची होत आहे.

कसबा पेठ मतदारसंघात विजय महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा झाला असला, तरी सोशल मीडियावर पराभूत उमेदवार अभिजीत बिचुकले यांची चर्चा होत आहे. भकास कसब्याचा विकास करण्यासाठी आपण कसबा निवडणूक लढवत आहोत असे बिचुकले म्हणाले होते. पण निवडणूकीत अभिजित बिचुकले यांचा पराभवच नाही तर डिपाॅझिट देखील जप्त झाले आहे. या पोट निवडणूकीत अभिजित बिचुकले यांना तब्बल ४७ मते मिळाली आहेत. कसब्यात अभिजीत बिचुकलेने जोरदार प्रचार केला होता. जास्तीत जास्त लोकांना भेट देऊन बिचुकलेने प्रचार केला होता. अभिजीत बिचुकलेला कपाट हे चिन्ह मिळालं होते. पराभवावर बोलताना बिचुकले म्हणाले की, ‘आज पराभव झाला असला तरी जनतेच्या मनात एक ना एक दिवस अढळ स्थान निर्माण करीन. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा सव्वा लाखांनी पराभव झाला होता. म्हणून त्यांनी समाजकारण सोडले नाही. मी तर स्वत:च्या मनगटाच्या बळावर समाजकारण करीत आहे’ असे अभिजित बिचुकले म्हणाले आहेत.
आता मी हरलो असलो तरी उद्याचा शंभर टक्के नेता आहे असा आत्मविश्वास अभिजित बिचुकले म्हणाले आहेत. बिचुकलेने आजवर अनेक निवडणुका लढवल्या असून त्याला यश आलेलं नाही. बिचुकलेला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण आता त्यांनी आपल्या पत्नीला पहिली महिला मुख्यमंत्री करण्याचा निश्चय केला आहे.