यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान बुधवारी (दि.२० नोव्हेंबर) रोजी पार पडले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सत्ता कोणाची येणार? याबाबत दावे प्रति दावे केले जात आहेत. अशातच, पुण्यात मात्र अजित पवारच मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. परंतु काही वेळातच हे बॅनर काढण्यात आले आहे.बॅनर काढल्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सरु झाल्या आहेत.
पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचा बॅनर झळकला. या बॅनरवर विकासाचा दादा, अजितदादा असाही उल्लेख करण्यात आला होता. हा बॅनर पक्षाचे नेते आणि पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे यांच्याकडून पुण्यामध्ये लावण्यात आला होता. मात्र बॅनर लावण्यात आल्यानंतर लगेच हा बॅनर हटवण्यात आल्याने त्याची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली. एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल दाखवण्यात आला असला, तरी अजित पवार गटाची परिस्थिती समाधानकारक नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये सर्वात कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एक्झिट पोलमधील अंदाजाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काहीशी निराशा आहे.दुसरीकडे, पक्षाच्या नेत्यांनी एक्झिट पोल बाजूला करत चांगली कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुण्यात लावण्यात आलेले बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण आता हे पोस्टर हटवण्यात आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता राज्यात कोणाचं सरकार येणारं याबाबत सर्वाचं लक्ष लागलं आहे. राज्यात महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येणार हे उद्या २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.