नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचे गिफ्ट
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात इतकी वाढ, महागाईचा भडका उडणार
मुंबई दि १(प्रतिनिधी)- आज सर्वजन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करत असताना इंधन कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे गिफ्ट दिले आहे. इंधन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १ जानेवारी २०२३ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. तर, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणाताही बदल झाला नाही. त्यामुळे वर्षाची सुरूवात महागाईने झाली आहे.
आजपासून १९ किलोंचा व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईत १७२१ रुपयांना मिळेल. सर्वांत जास्त किंमत चेन्नईत असून, तिथे १९७१ रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. इंधन कंपन्यांनी ६ जुलैला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. तेव्हा इंधन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली. होती. २०२२ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १५३ रुपयांची वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला इंधन कंपन्या गॅस दरवाढीबाबत निर्णय घेण्यात येत असतो. दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल आदींतील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात.गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १५३.५ रुपयांनी महागली आहे. त्याच वेळी, २०२२ मध्ये, घरगुती एलपीजीच्या किंमतीत चार वेळा बदल झाला आहे.
जीएसटीतही बदल
त्याचबरोबर १ जानेवारी २०२३ पासून. जीएसटी ई-इनव्हॉइसिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिलाचे नियम बदलणार आहेत. सरकारने ई-इनव्हॉइसिंगसाठी २० कोटी रुपयांची मर्यादा ५ कोटी रुपयांपर्यंत कमी केली आहे. हा नियम पहिल्या दिवसापासून लागू होईल. हा नियम लागू झाल्यानंतर आता ज्या व्यावसायिकांचा व्यवसाय वार्षिक पाच कोटींहून अधिक आहे, त्यांना इलेक्ट्रॉनिक बिल तयार करणे आवश्यक होणार आहे.