
देवेंद्र फडणवीसांचा विजयरथ कुणीही रोखू शकणार नाही
चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, शरद पवारांनी पाठित खंजीर खुपसला, बारामतीची जागा महायुतीच जिंकणार
पुणे दि १२(प्रतिनिधी)- शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम केले.. असे अनेक प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचा विजयरथ कुणीही थांबवू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
‘महाविजय-2024’ अंतर्गत शिरूर लोकसभा प्रवासात ते माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे यांनी शरद पवारांवर थेट हल्ला चढविला. ते म्हणाले, अजित पवार, छगन भुजबळ यांनी शरद पवारांविषयी सांगितले आहे, त्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. ते म्हणाले, मुख्यमंत्री पदावर अजित पवार की देवेंद्र फडणवीस असा वाद होण्याची शक्यताच नाही. भाजपा कार्यकर्त्यांना फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटत असेल तर त्यात काही गैर नाही. अजितदादा व एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांना ते मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. 2024 च्या निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर केंद्रीय पार्लिमेंट्री बोर्ड जो निर्णय घेईल, तोच मुख्यमंत्री होईल. बारामतीत महायुतीचा उमेदवार ५१ टक्के मते घेऊन निवडून येईल. उमेदवारी कुणाला दिली जाईल हा निर्णय पार्लमेंट्री बोर्ड घेईल. त्यामुळे बारामतीमधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात पवार कुटुंबातीलच उमेदवार असेल किंवा कुणी अन्य असेल यासंदर्भात आता काहीही सांगता येणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले. अजित पवारांना अंडर इस्टिमेट करण्याचे काम सुप्रिया सुळे करीत आहेत. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सर्वांत पहिला हार मी घालेन असे सुप्रिया सुळे म्हणाल्या असल्या तरी त्या अंर्तमनातून बोलल्या की भाऊ-बहिणीचे प्रेम म्हणून बोलल्या हे सांगता येत नाही, त्यांना एक सेकंदासाठीही अजितदादा चालत नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रवास नारायणगाव येथून सुरू केला. महाविजय 2024 अंतर्गत नारायणगाव येथे जुन्नर, आंबेगाव व खेड आणि भोसरी येथे शिरूर, हडपसर व भोसरी विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व शिरूरचा खासदार महायुतीचाच निवडून यावा असे आवाहन केले. नारायणगाव व भोसरी येथे घरचलो अभियानात सहभागी होत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी हितगुज केले. हजारो नागरिकांशी संपर्क साधत पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न केला, त्यावर सर्वांनी एकसुरात नरेंद्र मोदी यांचे नाव घेत, भाजपाला समर्थन दिले. या प्रवासात त्यांनी काही प्रतिष्ठित मान्यवरांशी स्नेह भेट घेतली व समसामायिक विषयांवर चर्चा करीत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी समर्थन मागितले.