मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ आहे का?
रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादवला ‘वर्षा’वरील गणपती आरतीचा मान, नेमके प्रकरण काय?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे मुश्कील असते. वर्षा वर प्रवेश देताना विविध पातळ्यांवर सुरक्षेची तपासणी केली जाते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात वर्षावर गुंडांना सहज प्रवेश मिळत असल्याचे दिसते. सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन ‘वर्षा’वरील गणपती आरतीला बोलावल्याचे उघड झाले आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
यासंदर्भात अतुल लोंढे पुढे म्हणाले की, विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. नोएडाच्या पोलिसांना एल्वीस यादव रेव्ह पार्ट्या आयोजित करतो याचा छडा लागला पण मुंबई अथवा महाराष्ट्र पोलीसांना एल्वीसच्या काळ्या कृत्यांची माहिती नव्हते असे म्हणता येईल का? एल्वीसची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असताना त्याची खबर पोलिसांनी नसावी व मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवास्थानी तो मुख्यंमत्र्यांचा पाहुणा म्हणून विशेष सन्मान दिला जातो हे आश्चर्यकारक आहे. एल्वीस यादवला ‘वर्षा’वर कोणाच्या सांगण्यावरून विशेष सन्मान मिळाला, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेचे ‘वर्षा’ बंगल्यावरील फोटो झळकले होते. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरच गुंडांना विशेष पाहुणा म्हणून मान सन्मान मिळत असेल तर पोलीस विभाग तर काय करणार? पण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा शासकीय ‘वर्षा’ बंगलाच जर गुंडांना ‘अतिथि देवो भव’ म्हणत असेल तर ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असाच प्रश्न पडतो असेही अतुल लोंढे म्हणाले आहेत.
दरम्यान या प्रकरणी एल्विश यादव एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याच्यावरील सर्व आरोप खोटं असल्याचं म्हण्टलं आहे. एल्विश म्हणाला की, माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पार्टीत ड्रग्स पुरवल्याच्या, विषारी सापांच विष पुरवल्याच्या बातम्या ऐकण्यात येत आहे. या बातम्यांमध्ये एक टक्काही यात काही सत्यता नाही. माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे आहेत. पण चौकशीसाठी मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन”. असं तो म्हणाला आहे.