‘एकनाथ शिंदेना धनुष्यबाण झेपेल की नाही माहित नाही’
मुख्यमंत्री शिंदेच्या क्षमतेवर नारायण राणेंना शंका, म्हणाले ठाकरेंशिवाय शिवसेना...
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आमदारांसह बंडखोरी करत भाजपासोबत सरकार स्थापन केले त्याचवेळी शिवसेनेवर देखील दावा करत पक्ष आणि चिन्ह देखील मिळवले. यानंतर सर्व भाजपा त्यांचे अभिनंदन करत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र एकनाथ शिंदे शिवसेना घालवतील का नाही यावर शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे युतीत आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
शिवसेनेचे नेतृत्व पहिल्यांदाच ठाकरे आडनावाशिवाय दुसऱ्याकडे गेले आहे. आता जुने शिवसैनिक नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “बाळासाहेबांची कोणाशी तुलना होऊ शकत नाही. ते वेगळं व्यक्तिमत्व होतं. एकनाथ शिंदे माझ्या सारखा शिवसैनिक आहे. शिवसैनिक पहिला मग कार्यकर्ता, शिवसैनिक हाच कार्यकर्ता असतो, त्याला साहेबांची विचारधारा माहिती. पण त्यांना काम किती जमेल हे मी सांगू शकत नाही, असे नारायण राणे म्हणाले आहेत. यावेळी नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंविषयी बोलताना भावुक झाले होते. बाळासाहेबांना मी खुप मानतो, माझ्या इतकी पद महाराष्ट्रात कोणालाच मिळाली नाही. बीएसीटी चेअरमन, आमदार, या पदाबरोबरच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते पद तर मी गाजवले आहे, असेही राणे म्हणाले आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनीही एका सभेत म्हणाले होते की शिवधनुष्य पेलणं फक्त बाळासाहेबांना जमत होते, एकाला जमले नाही आता ज्यांच्याकडे आहे त्यांना जमेल की नाही माहीत नाही. अशी सरळ प्रतिक्रिया दिली होती.
बाळासाहेबांनी प्रमुख म्हणून शिवसैनिक घडवले. हिंदुत्व आणि मराठी माणसांना न्याय देणे हे त्यांचे धोरण होते.एकनाथ शिंदे शिवसैनिक आहे पहिल्यापासून, साहेबांचा फोटो किंवा व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो, पण तुलना होऊ शकत नाही अशी ठाम प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे.