
‘उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात मीच घातल’
शिवसेना नेत्याचा मोठा गाैप्यस्फोट, महाविकास आघाडीचे निवडणूकीआधीच नियोजन
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह अपक्षच्या ५० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यांनतर शिंदे गटाने भाजप सोबत सरकार स्थापन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड का केले? असा सवाल विचारला जात होता. पण आता शिंदे गटातील नेत्याने मोठा खुलासा करत आपणच शिंदे यांना उठाव करायला भाग पाडले असा गाैप्यस्फोट केला आहे.
पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी हा दावा केला आहे ते म्हणाले “राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, ते राज्याच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच उचल खाल्ली होती. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे बसलो होतो. मी तेव्हाच त्यांना सांगितलं की, राज्यात जे सुरू आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जे चाललं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा की ही महाविकास आघाडी तोडली पाहिजे. राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले पाहिजे. उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात विजय बापू शिवतारेंनी घातलं असा मोठा दावा शिवतारे यांनी केला आहे. त्याचबरोबर “महाविकास आघाडी होणार हे निवडणुकीनंतर झाली हे सांगून लोकांना फसवत आहेत. महाविकास आघाडी होणार हे निवडणुकीच्या आधीच ठरलं होतं” असा गाैप्यस्फोटही शिवतारे यांनी केला आहे.
शिवसेना-भाजपा युतीच्या ७० जागा उद्धव ठाकरेंनी स्वत: घालवल्या. कोणत्या जागा जिंकायच्या, कोणत्या जागा पाडायच्या, सरकार बनवण्यासाठी आकडेवारी कशी जोडायची, हे कट कारस्थान निवडणुकीच्या आधीच झालं होतं”, असा आरोपही शिवतारे यांनी केला आहे. जूनमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडाखोरी करत भाजपासोबत सरकार स्थापन केल्यापासुन रोज नवनवीन दावे करण्यात येत आहेत. आता विजय शिवतारे यांच्या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यता आहे.