
मुख्याध्यापकानेच मारला शालेय पोषण आहारावर डल्ला
पोषण आहाराच्या वस्तू चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल, गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
छ. संभाजीनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने सुरु केलेला मध्यान पोषण आहार हा लहान मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय होता. त्याचबरोबर या पोषण आहाराबद्दल अनेकवेळा निकृष्टतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्याच बरोबर यात अपहार होत असल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात मुख्याध्यापकच पोषण आहार चोरत असल्याचे समोर आले आहे.
गंगापूर तालुक्यातील कनकोरी गावातील शाळेतील मुख्याध्यापक शालेय पोषण आहार आपल्या गाडीच्या डिक्कीत चोरुन नेत होता.तेंव्हा गावकऱ्यांनी याचा व्हिडिओ काढत तो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याआधीही याच मुख्याध्यापकाने अनेकदा पोषण आहारावर डल्ला मारत होता. त्यावेळी अनेकदा समज देऊनही तो सुधारण्याचे नाव घेत नव्हता आता गावकऱ्यांनी या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबतीत गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक तडवी सर आणि त्यांचे साथीदार शिक्षक वाडीले हे रोजचे पोषण आहाराचे सामान चोरत असल्याचा आरोप केला आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप शिवनाथ पवार यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या सर्व घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्याध्यापकांना याआधीही गावकऱ्यांनी पकडले होते. त्याची शूटिंग करुन त्यांना समज देण्यात आली होती. तरीही मुख्याध्यापकांनी आपले प्रताप बंद केले नाहीत त्यामुळे गावकऱ्यांनी कारवाई बरोबरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.