कर्नाटक दि २०(प्रतिनिधी)-आजकाल चैनीसाठी आणि भाैतिक सुखासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात याचेच एक उदाहरण कर्नाटकात समोर आले आहे. येथील अरसीकेरे शहरात एका तरुणाने आयफोनसाठी डिलिव्हरी बाॅयची हत्या केल्याचे समोर आले आहे.
हेमंत दत्त असे आरोपीचे नाव असून त्याने ऑनलाइन सेकंड हँड आयफोन ऑर्डर केला होता. ई- कार्टचा डिलिव्हरी बॉय हेमंत नाईक याच्याकडे बुकिंग पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. डिलिव्हरी बॉय हेमंत नाईक हा आयफोन घेऊन लक्ष्मीपुरा भागातील ग्राहक हेमंत दत्ता यांच्या घरी पोहोचताच त्याने कॅश ऑन डिलिव्हरी अंतर्गत फोनसाठी ४६ हजार रुपये देण्यास सांगितले. याठिकाणी हेमंत दत्ता याने घराबाहेर थांबलेल्या हेमंत नाईक याला आपल्या घराच्या आतील बहाण्याने बोलावले आणि नाईक आत येताच दत्ता याने त्याच्यावर चाकूने अनेक वार करून त्याचा खून केला. त्यानंतर हेमंत दत्त याने तीन दिवस मृतदेह घरातच ठेवला आणि संधी मिळताच गोणीत मृतदेह भरून रेल्वे ट्रॅकजवळ जाळला.
मात्र मृतदेह घेऊन स्कूटीरून जात असताना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी हेमंत दत्ताला पकडले असता त्याने संपूर्ण घटनेची कबुली दिली.